कतर्व्यावर मद्यपान करणे पडले महागात,पुरवठा निरिक्षक अविनाश निकम निलंबित…
श्रीगोंदा तहसील कार्यालयातील पुरवठा निरिक्षक अविनाश निकम यांच्यावर महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केल्याचे आदेश काढले.
श्रीगोंदा तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अविनाश निकम हे कार्यालयीन वेळेत श्रीगोंदा शहरातील एका हॉटेलमध्ये बसून मद्यपान करीत असल्याचा फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. या फोटो तसेच व्हिडिओच्या आधारे बीआरएसचे समन्वयक टिळक भोस यांनी श्रीगोंदा तहसीलदार यांचेकडे तक्रार केली.
त्यानुसार पुरवठा निरीक्षक निकम यांना कार्यालयात बोलावून घेतले व वैद्यकीय अधिकाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पत्र तयार करीत असतांना निकम कार्यालयातून पळून गेले. श्रीगोंदा तहसीलदार यांनी याचा अहवाल तयार करत वरिष्ठ कार्यालयात पाठविला.
निकम यांनी शासकीय कामात नितांत सचोटी व कर्तव्य पारायणता राखलेली नाही. तसेच शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय कृत्य केलेले आहे. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करत पुरवठा निरीक्षक अविनाश निकम यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढला.
