एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कमिटीच्या बैठकीत यावर यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे दुसऱ्या दिवशी प्रवाशांचे हाल झाले. सातवा वेतन आयोग लागू करा यासह विविध मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे राज्यभरातील एसटी सेवा विस्कळीत झाली होती. या संपामुळे अंदाजे सुमारे २२ कोटी रुपयांचा महसूल बुडाला. बुधवारी दिवसभरात ११ कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील एसटीच्या २५१ पैकी ९४ आगार पुर्णतः बंद होते. ९२ आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर ६५ आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
राज्यातील एसटी कामगारांनी दोन दिवसांपासून पुकारलेल्या संपानंतर बुधवारी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी कामगार संघटना आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत चर्चेअंती राज्य सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य करत एसटी कामगारांच्या पगारात घसघशीत वाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात साडे सहा हजाराची वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, एसटी कर्मचारी संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२० पासून सरसकट मुळ वेतनात ६५०० रुपये वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.