उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी, शिक्षण उपसंचालकांवर गुन्हा दाखल
पुणे विभागाचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक व सध्या नंदूरबार येथे कार्यरत असलेले माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रवीण अहिरे व त्यांच्या पत्नी स्मिता अहिरे यांच्या विरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्या प्रकरणी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.बंडगार्डन पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण अहिरे यांनी मिळवलेल्या मालमत्तेची पुणे एसीबी कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली होती.अहिरे यांनी 18 मार्च 2020 ते 10 फेब्रुवारी 2020 या कार्यकाळात त्यांना प्राप्त झालेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतेची मालमता स्वत:च्या व पत्नीच्या नावे जमा केल्याचे निष्पन्न झाले होते.उत्पन्नापेक्षा त्यांनी 25.26 टक्के अधिक मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले.ही मालमत्ता 31 लाख 78 हजार रुपये एवढ्या किमतीची होती.
याबाबत पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, पुणे एसीबीकडे शिक्षण उपसंचालक कार्यालयातील रखडलेले काम करून देण्यासाठी प्रविण अहिरे 50 हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार आली होती.त्यावळी उपसंचालक कार्यालयातील शिपायाला तडजोडी अंती 26 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते.प्रवीण अहिरे यांनीच शिपायाल लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते.
बेहिशोबी मालमत्ता संपादित केल्या प्रकरणी प्रवीण अहिरे यांना त्यांची पत्नी स्मिता अहिरे यांनी सहाय्य करुन गुन्ह्यात प्रोत्साहित केले.त्यामुळे प्रवीण अहिरे व त्याची पत्नी स्मिता अहिरे यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
