इयत्ता दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट, तर दहावीची पुरवणी परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ ते ३० जुलै दरम्यान होणार आहे. तर बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. तसेच बारावीच्या माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान विषयाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सात आणि आठ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सॲप किंवा अन्य माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये.
पुरवणी परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारपासून (ता.३) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


