आश्रमशाळेत 240 बनावट विद्यार्थी दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटत असल्याचा प्रकार,मान्यता रद्दचा प्रस्ताव…
धाराशिव जिल्ह्यातील आश्रमशाळेत कागदावर बनावट विद्यार्थी दाखवून लाखो रुपयांचे अनुदान लाटत असल्याचा प्रकार आढळून आला आहे. आश्रमशाळेला मान्यता २४० विद्यार्थ्यांची मात्र तपासणीच्या वेळी एकही विद्यार्थी नसल्याने हा बनावटपणा उघडकीस आला आहे. तर प्रशासनाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
भटक्या विमुक्त जाती तसेच जमातीतील विद्यार्थी, इतर मागासवर्गीय मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन स्तरावरून आश्रमशाळांना मंजुरी दिली जाते. तुळजापूर तालुक्यातील ही प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. यामध्ये २४० विद्यार्थी संख्येला मान्यता आहे. त्यामुळे दरवर्षी या संखेने शासनाकडून अनुदान वितरित होते.
याबाबत समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांच्या कार्यालयाकडून १२ डिसेंबर २०२३ रोजी आश्रम शाळेची तपासणी केली आहे. यात शाळेत एकही विद्यार्थी आढळला नाही. त्यामुळे या शाळेला आता कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच शाळेचे अनुदानही थांबविण्यात आले आहे.
आश्रमशाळेत तपासणी दरम्यान एकही विद्यार्थी उपस्थित नसल्याचे दिसून आले. वसतिगृह, शाळा परिसरात स्वच्छता नव्हती. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क, आसनपट्ट्या उपलब्ध करून दिलेल्या नव्हत्या. शिवाय मुला-मुलींच्या इमारतीची स्थितीही चांगली नाही. ज्या खोल्यांमध्ये विद्यार्थी दाखवले जातात, त्या इमारतीच्या खोल्या निकृष्ट दर्जाच्या आहे. कोणत्याही सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. मुला-मुलींसाठी आवश्यक स्नानगृह, स्वच्छतागृह दुर्गंधीयुक्त अवस्थेत होते. पाण्याचे नळही तुटलेली आहेत. शाळा ही गावाच्या बाहेर असून शाळेभोवती कुठलीही संरक्षण भिंत तसेच तारेचे कंपाउंड नाही.सीसीटीव्ही, बायोमेट्रिक यंत्र त्या ठिकाणी नव्हते. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी, आरो फिल्टर बसवण्यात आलेले नव्हते. स्वयंपाकगृह बंद असल्याचे दिसून आले. २०१५ पासून संस्थेत अंतर्गत वाद असून अद्याप मिटलेला नाही. अशाही स्थितीत संस्थेला अनुदान दिले जात असल्याने समाज कल्याण विभागाने केलेल्या तपासणीत उघडकीस आले आहे.
जिल्हा कार्यालयाकडून आश्रमशाळेची तपासणी झाली आहे. त्यावेळी एकही विद्यार्थी शाळेत नव्हता. अनेक त्रुटी शाळेत दिसून आल्या आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थी नसल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणून आम्ही त्यांचे दहा लाखाचे अनुदानही थांबविले आहे. त्यांचा मान्यता रद्दचा प्रस्ताव तयार करीत आहोत अशी माहिती बाबासाहेब अरवत, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग, धाराशिव यांनी दिली.
