आश्रमशाळेतील ९० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा,उपचार सुरू…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सकाळी दुधातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांनावैद्यकीय उपचारासाठी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ आणि ग्रामीण रुग्णालय खुलताबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील तिसगाव येथील आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी शिक्षण घेत असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना निवासासह भोजन आणि शिक्षण अशा सुविधा शासनाच्या वतीने देण्यात येतात. या ठिकाणी अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या 317 असून आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांना आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध झालेले दूध देण्यात आले होते.
हे दूध पिताच विद्यार्थ्यांना मळमळ उलट्या जुलाब यासारख्या त्रास जाणवू लागल्याने काही विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली.संबंधित आदिवासी शाळा प्रशासनाने तातडीने 96 विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय खुलताबाद आणि प्राथमिक आरोग्य केंद्र वेरूळ येथे वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. या ठिकाणी विद्यार्थ्यांना आल्यावर सलाईन देण्यात आली तसेच औषधोपचार सुरू आहेत.
विद्यार्थ्यांना विषबाधा सुरू झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. विद्यार्थ्यांवर देखरेख करण्यासाठी कुठेही भक्कम यंत्रणा नाही. गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. जे जबाबदार असतील त्यांच्यावर त्वरित कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
