आश्रमशाळेतील सातवीतील मुलीने दिला बाळाला जन्म,गुन्हा दाखल…
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात एका आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात बाभळेश्वर आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीचे दहावीत शिकणाऱ्या एका मुलाशी प्रेम संबंध जुडले. त्यांच्या मध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती झाली.
जून २०२३ मध्ये ही मुलगी आईच्या घरी गेली. तिला मळमळ होऊ लागली. त्यामुळे आईने तिच्याकडे चौकशी केल्यावर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता ती गरोदर असल्याचे आढळून आले.
मुलीच्या पालकांनी मुलाच्या पालकांना हे सांगून लग्नाची गळ घातली. तेही तयार झाले. त्यानंतर आंबेगाव (जि. पुणे) तालुक्यात त्यांचा साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला.
मधल्या काळात गरज पडेल तशी ती रुग्णालयात उपचारासाठीही जात होती. मात्र, आपले वय १९ सांगत असल्याने डॉक्टारांनीही त्यात फारसे लक्ष न घालता उपचार व सल्ला देत राहिले. १३ डिसेंबरला मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला प्रसुतीसाठी रुग्णालात दाखल करण्यात आले. तिने मुलाला जन्म दिला.
तेथील डॉक्टरांनी मुलीच्या वयाची चौकशी केली असता ते कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली आणि हा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यावर दोघांनी रितसर विवाह केल्याचे नातेवाईक सांगत होते. मात्र, दोघांनी विवाह केला असला, तरी दोघेही अल्पवयीन असल्याने त्याला कायद्यात आधार नाही. हा बालविवाह ठरतो आणि तो शेवटी गुन्हाच आहे. शिवाय मुलाविरूद्ध तिच्यावर अत्याचार केल्याचाही गुन्हा दाखल केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून संगमनेर तालक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात तपासासाठी वर्ग केला आहे.


