आश्रमशाळेतील आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या…
कोठली (ता.नंदुरबार) येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थिनीला तिची आई चार दिवस अगोदरच भेटून गेली होती. तेव्हा मुलगी आनंदित होती. मात्र घरी शाळेतील प्रशासनाने फोनवरून मुलीची तब्येत बिघडल्याची माहिती दिली. नंतर थोड्या वेळाने मुलीने गळफास घेतला असे सांगितल्याचा आरोप मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासनावर केला. मुलीला न्याय मिळावा, आम्ही जेव्हा भेटायला आलो होतो, तेव्हा मुलगी चांगली होती, अचानक हे कसं काय, असा प्रश्न केला.
विद्यार्थीनी अक्कलकुवा तालुक्यातील खुशीमाल येथील रहिवासी असून, तिने गळफास कशाबद्दल घेतला ते कारण अद्याप समजू शकले नाही. विद्यार्थिनीचा मृत्यदेह नातेवाईक आल्यावर त्यांना सोपविण्यात आला.
पुढील तपासणी अहवालासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात पाठविण्यात आला. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संजय महाजन, उपनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय वसावे, उपनिरीक्षक जगन वळवी, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, विस्ताराधिकारी निर्मल माळी, जमादार वंतू गावित आदी घटनास्थळी उपस्थित होते.
घटनेचे कारण गुलदस्त्यात असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यावरच घटनेचा खरा तपशील कळेल.
