आश्रमशाळा कर्मचारी यांचे वेतनासाठी लोटांगण आंदोलन.
इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यभरात विमुक्त जाती भटक्या जमातीच्या व ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा कार्यरत आहेत.
या आश्रमशाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून वेतन रखडले आहे. वारंवार वेतन अदा करण्यासाठीं मागणी करून देखील प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी लोटांगण आंदोलन केले.
याबाबत आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली असता, इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यात आश्रमशाळा चालविल्या जातात, यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेला वेतन अदा करण्यात यावे असा विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. मात्र शासन निर्णय निर्गमित झाला तरी सुद्धा आमचे वेतन कधीही एक तारखेला होत नाही. बऱ्याच वेळा शासनाकडून वेतन अनुदान वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे आमचे वेतन एक तारखेला अदा होत नाही असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
वेतन वेळेवर होत नसल्याने विविध बँक,पतपेढी यांच्याकडून कर्ज घेण्याची वेळ येते, मात्र वेतन वेळेवर होत नसल्याने या कर्जाचे हफ्ते,होम लोन हफ्ता व इतर पारिवारिक दैनिक गरजा भागवण्यासाठी मोठी अडचण येते,आता दसरा व दिवाळी सण जवळ आले असून तीन महिन्यापासून वेतन झालेले नाही.
यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी लोटांगण घालत दाद मागितली असल्याचे कर्मचारी यांनी सांगितले सदर बाबीकडे शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सर्व आश्रमशाळा कर्मचारी यांच्याकडुन होते आहे.
