आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 60 टक्के जागा रिक्त, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार यांचा प्रश्नांचा भडिमार…
विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 60 टक्के जागा रिक्त असल्याचे सांगत, त्या जागा कधी भरणार आहात, अशी विचारणा त्यांनी केली. गणित आणि विज्ञानासाठी तर शिक्षकच नसल्याचे ते म्हणाले.
त्यावर मंत्री सावे यांनी उत्तर देताना, आश्रम शाळेतील रिक्त 282 जागा भरण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्या जागा लवकरात लवकर भरण्यात येतील असे मोघम उत्तर त्यांनी दिले.
त्यावरून ज्या जागा भरायच्या आहेत, त्या तत्काळ भरण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यावर सावे यांनी शाळांकडून प्रस्ताव आल्यानंतर एक महिन्यात या जागा भरण्यात येईल, असे सभागृहाला सांगितले. आमदार विकास ठाकरे यांनी देखिल आश्रमशाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबात प्रश्न उपस्थित केला होता.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात 72 वसतिगृह सुरू होणार होती, त्याचे काय झाले ? ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलेले आहेत. त्या विभागाच्या अनेक बैठका झाल्या आहेत. सत्र संपत आले आहे, तरी वसतिगृह नाहीत. ओबीसींवर अन्याय का करता ? असा खडा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
त्यावर मंत्री सावे यांनी सांगितले की, राज्यात 52 वसतिगृह जानेवारीमध्ये सुरू होतील. मात्र, शहरी भागात अडचणी आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये प्रस्थाव पाठवला आहे. ते ही लवकरात लवकर सुरू करण्यात येतील,” असे सावे यांनी स्पष्ट केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने स्वाधार योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू होणार आहे का ? सगळ्यांना या योजनेच्या माध्यमातून मदत मिळते. ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नसल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीच्या योजने संदर्भातही वडेट्टीवार आक्रमक झाले होते. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकर मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला होता.
त्यावर मंत्री सावे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आधी आपण 50 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होतो. आता आपण 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत आहोत. तसेच शिष्यवृत्तीचेही पैसे सगळ्या विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. त्यावर वडेट्टीवार यांनी 100 विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी केली.
