अपडेटशैक्षणिक

आश्रमशाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला 15 दिवसाचा अल्टिमेट, अन्यथा कारवाई होणार

Share this post

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमधील निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले असून त्यासाठी आश्रमशाळांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. शाळा आणि वसतिगृहाचे प्रवेशद्वार, मैदान, वर्ग, स्वच्छतागृहाकडे जाणारी वाट, भोजनालय, पायऱ्या, कार्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा आदी परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरा चित्रणाची आठवड्यातून किमान तीनदा तपासणी केली जाणार आहे. त्यात काही आक्षेपार्ह आढळून आल्यास त्याची चौकशी करून प्रकल्प अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांकडे तक्रार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आश्रमशाळांमध्ये एक विशेष नियंत्रण कक्ष असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भोंगा बसविण्यात येणार आहे. शाळा आणि वसतिगृहाच्या दर्शनी भागात चाइल्ड हेल्पलाइन, आदिवासी विकास विभाग मदत कक्ष, टोल फ्री क्रमांक, टेलेमानस, परिसरातील आरोग्य केंद्र, पोलीस ठाणे आदींचे क्रमांक असलेले फलक लावणे आवश्यक आहे.

बदलापूर घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यानंतर राज्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश देण्यात आले. परंतु काही आश्रमशाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने राज्यातील आश्रमशाळांना १५ दिवसांची मुदत दिली आहे. निर्धारित मुदतीत सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास संबंधित आश्रम शाळेवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास विभागाकडून देण्यात आली आहे.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *