आयकरासह इतर सर्व करांचे दर जैसे-थे राहणार…
यंदाच्या हंगामी अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर रचनेत कोणतेही बदल सुचवलेले नाहीत. त्यामुळं आयात शुल्कासह आयकर, वस्तू आणि सेवा कर, मूल्यवर्धित कर, यासारख्या करांचे दर जैसे-थे राहतील. आयकराच्या छोट्या थकित रकमेच्या मागण्या माफ करण्याचा निर्णयही त्यांनी आज जाहीर केला. याचा फायदा सुमारे १ कोटी करदात्यांना होईल.
२०१४ पूर्वीची अर्थव्यवस्थेची परिस्थिती, त्या काळातलं गैरव्यवस्थापन आणि आताची परिस्थिती यावर श्वेतपत्रिका जाहीर करण्याचा निर्णयही अर्थमंत्र्यांनी आज जाहीर केला.
वेगानं वाढत असलेली लोकसंख्या आणि लोकसंख्येत होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारी आव्हानांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. या आव्हांनांचा आढावा घेऊन त्यावर पर्याय सुचवण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी आज केली.
यंदाच्या वर्षात ३० लाख ८० हजार कोटी रुपयांचं उत्पन्न अपेक्षित असून ४७ लाख ६६ हजार कोटी रुपयांचा व्यय अपेक्षित आहे. यातला २६ लाख दोन हजार कोटी महसूल, करातून मिळेल. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट ५ पूर्णांक ८ दशांश टक्के असून आगामी आर्थिक वर्षात ती ५ पूर्णांक १ दशांश टक्के असेल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळं २०१५-२६ या आर्थिक वर्षापर्यंत साडे ४ टक्क्यांचं उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा विकासाकरताची तरतूद ११ टक्के वाढवून ११ लाख ११ हजार १११ कोटी रुपये करण्यात आली आहे.


