आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण,निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष…
आमदार अपात्रता प्रकरणी निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागणार की शिंदे गटाच्या याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण झालीय. 10 जानेवारीला निकाल देणार आहे, अशी माहिती स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलीय.
तसंच राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकालही 30 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचा प्रयत्न आहे, असंही नार्वेकर म्हणालेत. याबाबत तीन शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
१) निकाल ठाकरे गटाच्या बाजूनं लागला तर शिवसेना शिंदे गटातील 40 पैकी 16 आमदार अपात्र ठरतील .
२) निकाल शिंदे गटाच्या बाजूनं लागला तर शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदार अपात्र ठरतील.
३)कोणत्याही गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही, विधानसभा अध्यक्ष प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील.
निकालात जर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार अपात्रच ठरले नाहीत तर शिवसेनेच्या दोन्ही गटांना सुप्रीम कोर्टात आपणच खरी शिवसेना आहोत हे सिद्ध करावं लागेल.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण 34 याचिकांचा 6 गटात समावेश करुन सुनावणी पार पडली. त्यामुळे निकालाचा केवळ सारांश वाचला जाईल. कोणत्याच गटाचा आमदार अपात्र ठरणार नाही असाच निकाल येण्याची शक्यता सर्वाधिक मानली जातेय. कारण शिंदे गटात मुख्यमंत्री शिंदेंसह 3 मंत्री आहेत. शिंदे गट अपात्र ठरला तर त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो तर ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरले तर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळेल. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतील असाच अंदाज बांधला जातोय.


