आता विद्यार्थ्याना पहिलीपासून शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान, मंत्री केसरकर यांची माहिती…
नवीन शिक्षण धोरणानुसार सध्या राज्यात शालेय अभ्यासक्रमात व्यापक बदल केले जात आहेत. भारत देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा कृषी आहे.
यामुळे शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान मुलांना लहानपणापासून दिले जाणार आहे. मुलांना शेतीचे ज्ञान झाल्यास ते व्यावहारिक शेती करू शकतात. यामुळे राज्यात पहिलीपासून कृषी विषय अभ्यासक्रमात शिकवण्यात येणार आहे.
कृषी विषयासाठी नवीन मसुदा तयार झाला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय असणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे जागतिक बँक प्ररस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प संस्थात्मक विकास योजना आयोजित ‘आधुनिक कृषी शिक्षणाची संधी: भविष्याची उज्ज्वल नांदी’ या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मुलांना मातृभाषेतून म्हणजेच मराठीमधून शालेय शिक्षणात शेती अभ्यास शिकवण्यात येणार आहे.धडे देताना जिल्हा परिषद शिक्षकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी कृषी विद्यापीठांशी सामंजस्य करार केला जाणार आहे. त्या-त्या कृषी विद्यापीठांकडून शिक्षकांना कृषी शिक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.पहिलीपासून कृषी शिक्षण देण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाची भूमिका महत्त्वाची असेल असे मंत्री केसरकर म्हणाले.
जगाला मॅन पॉवर पुरवण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये आहे. जगात स्किल डेव्हलपमेंटसाठी मुले पाहिजेत. आपण आपल्या अभ्यासक्रमात कौशल्य विकासावरच भर देत आहोत. मुलांना ज्ञान आणि रोजगार मिळावा, हा उद्देश ठेऊन अभ्यासक्रम करत आहोत असेही ते म्हणाले.


