आज पासून अमळनेरमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन…
९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, जळगावमध्ये सुरू होत आहे. यापूर्वी १९५२ साली अमळनेरमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तब्बल ७२ वर्षांनी पुन्हा एकदा अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगणार आहे.
साहित्यिकांमध्ये संमेलनाच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी साहित्यिकांसह दिग्गज मंत्री सुद्धा या संमेलनास हजेरी लावणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
अमळनेरात हे संमेलन २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आलेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. यासाठी वाडी संस्थानपासून सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे आणि जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होणार आहे.
२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल.
सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचसोबत इतर दोन सभामंडपांमध्ये परिसंवाद आणि कविकट्ट्याचे आयोजनही करण्यात आले आहे.


