८ तारखेला लग्न, सीमेवरील जवानाला वडिलांचा फोन..जवान म्हणाला – दोन दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करून येतो, मात्र दुसऱ्या दिवशी भारताचा वीर शहीद अत्यंत दुःखद घटना…
जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत उत्तरप्रदेशमधील (UP) अलीगढमधील जवानाने प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. सचिन लौर असे जवानाचे नाव आहे.
दहशतवाद्यासोबतच्या चकमकीपूर्वी त्यांनी कुटुंबासोबत फोनवर चर्चा केली होती. इकडे सगळं काही ठिक असल्याचे सांगितले होते, पण पुढच्याच क्षणाला होत्याचे नव्हते झालं. धक्कादायक म्हणजे, आठ डिसेंबर रोजी सचिन यांचं लग्न होणार होते. ते थोड्याच दिवसांतर सुट्टी घेऊन गावी येणार होता, त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले.20 मार्च 2019 रोजी सचिन लौर हे आर्मीमध्ये दाखल झाले होते.
8 डिसेंबर रोजी सचिनचं लग्न होणार होते. मथुरेच्या जयस्वान गावात राहणाऱ्या एका मुलीशी त्यांचे लग्न ठरले होते. दोन्ही घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, बुधवारी रात्री सचिनने वडील रमेश आणि मोठा भाऊ विवेक यांच्याशी फोनवर बोलून सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. ऑपरेशन चालू असल्याचेही त्याने सांगितले होते. अजून दोन जण बाकी आहेत, त्यांचा खात्मा करु द्या, त्यानंतर बोलूयात. असे सचिन म्हणाले होते. पण काही वेळाने त्यांच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना मिळाली.
सचिनचे वडील रमेश म्हणाले, ‘मला संध्याकाळी फोन आला होता आणि तो म्हणाला की पापा, अजून फक्त दोन जण बाकी आहेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त केल्यानंतरच येईन. मला काळजी वाटते, असेही मी म्हणालो. त्यावर तो म्हणाला हे सर्व संपवूनच येईन. तुम्ही तयारी करा, मी येतो.’ पण त्यानंतर सकाळी दुःखद बातमी मिळाली.
सचिनचे वडील रमेश पेशाने शेतकरी आहेत. मुलाच्या निधनाच्या बातमीनंतर वडील रमेश आणि आई भगवती देवी स्वत:ला संभाळू शकले नाहीत. शहीद सचिन यांचे पार्थिव शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांच्या गावी पोहोचेल. संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. सचिन त्यांच्या तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता.