सर्व शाळांमध्ये आता मुलींना कराटे प्रशिक्षण; शिक्षण आयुक्तालयाच्या सूचना…
राज्यातील विद्यापीठे आणि काॅलेजप्रमाणेच आता शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींनाही तीन महिने कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासंदर्भात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी परिपत्रक काढावे. अशी सूचना शिक्षण आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. मुंबई येथील वसतीगृहात विद्यार्थीनीची निर्घूण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे मुलींना शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवणे काळाची गरज असल्याचे पत्र काही संघटनांनी शिक्षण विभागाला दिले होते, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य शासनाने २०१४ मध्ये तिसरे महिला धोरण जाहीर केले आहे. त्यातील मुद्दा क्र. ६.१३ नुसार सर्व शिक्षण संस्थांनी मुलींसाठी किमान एकदा तीन महिन्यांचा कराटे प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शाळांना मुलांना किमान तीन महिने कराटे प्रशिक्षण देणे बंधनकारक असणार आहे. या मागणीसाठी सुराज्य निर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा पुष्टी भारद्वाज यांनी पुढाकार घेऊन मुलींसाठी कराटे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी करणारे पत्र शिक्षण आयुक्तालयास पाठविले होते.
शिक्षण आयुक्तालयातील प्रशासन अधिकारी रजनी गावडे यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालकांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार संचालक कार्यालयाकडून परिपत्रक काढण्यात येणार असून राज्यातील विभागीय कार्यालयांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये मुलींसाठी कराटे प्रशिक्षण उपक्रम राबविण्याची सूचना दिली जाणार आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सुमारे दीड कोटी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणार आहेत. यामुळे मुलींवर होणारे अत्याचार रोखले जातील हो महत्त्वाचा उद्देश आहे.