शालेय पोषण आहारात आढळला मृत बेडूक, शाळेतील संतापजनक प्रकार
विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून पोषण आहार पुरवला जात आहे. मात्र शालेय पोषण आहारात सातत्याने आळ्या, किडे, झुरळ, उंदराच्या लेंड्या अशा धक्कादायक गोष्टी आढळत आहेत. त्यामुळे शासनाकडून निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जात असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान अशातच एक संतापजनक बातमी समोर आली आहे. अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क बेडकाचे मृत पिल्लू सापडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूरच्या कासेगावातील भुसे नगर येथील अंगणवाडीमध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क बेडकाचे मृत पिल्लू सापडले आहे. या धक्कादायक घटनेमुळे लहानग्यांच्या जीवाशी शासनाचा खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. तसेच पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शालेय पोषण आहारात अशाप्रकारे मेलेला प्राणी सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. राज्यातील विविध जिल्ह्यांतून याआधीदेखील असे प्रकार समोर आले आहेत.
शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यातही तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय अशी शंका या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून दिसत आहे. या अगोदर देखील कासेगावमध्ये शालेय पोषण आहारामध्ये मेलेला किडा आढळला होता. परंतु त्यावेळी पालकांनी दुर्लक्ष केले. आठवडाभरातच आता हा प्रकार समोर आला आहे. लहान मुलांना देण्यात येणारा खाऊ चार महिन्यांपूर्वी शाळेत आला होता. म्हणजे हे बेडकाचे पिल्लू किती महिन्यांपूर्वी मरुन पडले असेल याचा विचार न केलेलाच बरा आहे. शासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त पालकांनी केली आहे.