वर्ल्ड कपनंतर पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान…
क्रिकेटच्या मैदानावरील भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट प्रेमी नेहमी उत्सुक असतात. नुकत्याच पारपडलेल्या आयसीसी वर्ल्ड कप 2023 मध्ये 14 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. यानंतर आता पुन्हा पुढच्याच महिन्यात क्रिकेट प्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याचा रोमांच अनुभवता येणार आहे.
पुढील महिन्यात अंडर 19 आशिया कपचा 10 वा सीजन खेळवला जाणार असून यात भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच ग्रुपमध्ये असल्याने दोघांमध्ये एकमेकांविरुद्ध सामना पाहायला मिळेल. अंडर 19 आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून यापूर्वी सर्वाधिक 8 वेळा भारताने अंडर 19 आशिया कपचे विजेतेपदं पटकावले. 8 ते 19 डिसेंबर दरम्यान आशिया कपची स्पर्धा खेळवली जाणार असून यंदाच्या वर्षी भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, जापान, नेपाल आणि यूएई या 8 टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
अंडर 19 आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 8 डिसेंबरला अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. तर 10 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. 12 डिसेंबर रोजी भारताचा तिसरा आणि अंतिम गट फेरीचा सामना नेपाळशी होणार आहे.