लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप २०२४-२०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू, गुणवंत विद्यार्थीनींना मिळणार १ लाखांपर्यंत स्कॉलरशिप
लेग्रैंड एम्पावरिंग स्कॉलरशिप प्रोग्राम २०२४-२०२५ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून याद्वारे गुणवंत विद्यार्थीनींना 1 लाख रूपयांपर्यंत मदत केली जाणार आहे.
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी 5 सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यात गुणवंत विद्यार्थीनी, अपंग महिला विद्यार्थी, कोविड-प्रभावित विद्यार्थी, LGBTQ विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी आणि एक पालक असलेल्या विद्यार्थिनींना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणून ही स्काॅलरशिप दिली जाते.
ही शिष्यवृत्ती कार्यक्रम भारतातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी आहे. अर्जदाराने भारतातील B.Tech, BE, B.Arch, BBA, B.Com किंवा B.Sc पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. अर्जदाराने 2023-24 या शैक्षणिक वर्षात 12 वी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदाराने 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 70 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेले असावेत. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, असे निकष सामान्य श्रेणीतील विद्यार्थीनींसाठी आहेत.
सामान्य श्रेणीसाठी शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विद्यार्थिनींना अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत 60 टक्के अभ्यासक्रम शुल्क, दरवर्षी कमाल 60 हजार रुपये दिले जातील. तर विशेष श्रेणीसाठी शेक्षणिक कामगिरीच्या आधारावर, विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांना 80 टक्के अभ्यासक्रम शुल्क, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत प्रति वर्ष कमाल 1 लाख रुपये दिले जातील.