रोहित पवारांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. ईडी चौकशी प्रकरणी खोटे व चुकीचे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. रोहीत पवार यांची ईडी चौकशीनंतर गुलाबराव पाटील यांनी डल्ला मारला असेल, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. तसेच गल्ला जर मारला असेल, डल्ला खाल्ला असेल तर चौकशीला जावेच लागेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले होते.
या चौकशीनंतर कोणी खोटे कींवा चुकीचे आरोप केले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रोहित पवार यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुणे न्यायालयात रोहित पवार यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्याविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.