राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने राज्यातील शाळांना शिक्षण सप्ताह साजरा करण्याच्या सूचना
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने 22 ते 28 जुलै या कालावधीत “शिक्षण सप्ताह” (Education Week) साजरा करण्याच्या सूचना केंद्र शासनातर्फे देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे येत्या आठवड्यात प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला आहे. त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश करण्यात आला असून हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे.या संदर्भातील पत्रक शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्ध केले आहे.
शिक्षण सप्ताहाच्या पहिल्या दिवशी येत्या 22 जुलै रोजी अध्ययन-अध्यापन साहित्य दिन साजरा करावयाचा आहे. तर 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला जाणार आहे. वाचनात प्राविण्य मिळवण्यासाठी मूलभूत ज्ञान कौशल्याकडे लक्ष देणे आणि संख्याशास्त्रावरील राष्ट्रीय मिशनची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. 24 जुलै रोजी क्रीडा दिवस साजरा केला जाणार असून या दिवशी क्रीडा आणि फिटनेस विषयी जागृती केली जाणार आहे. तसेच या निमित्ताने समकालीन खेळांना समांतर स्वदेशी खेळ शोधण्याची तयारी करणे आवश्यक आहे. तर 25 जुलै रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात येणार असून हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित करावा. शाळा विविध भाषा , वेशभूषा , खाद्यपदार्थ , कला , वास्तूकला,स्थानिक खेळ, चित्रकला, नृत्य, लोक आणि पारंपरिक कला, पथनाट्य कथा-कथन आदी कार्यक्रमाचे आयोजन करावे.
विद्यार्थ्यांना उपलब्ध कौशल्य पर्यायाचे महत्व पटवून देण्यासाठी येत्या 26 जुलै रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा केला जाणार आहे. तर 27 जुलै रोजी शालेय पोषण दिवस आणि 28 जुलै रोजी समुदाय सहभाग दिवस साजरा करण्यात येणार आहे. विद्यांजली हा शालेय स्वयंसेवक व्यवस्थापन कार्यक्रम आहे . जो शिक्षण मंत्रालयाअंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जातो. या कार्यक्रमांतर्गत माजी विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षक, शास्त्रज्ञ निवृत्त सशस्त्र दलाचे कर्मचारी आदी यांच्या माध्यमातून मालमता , साहित्य, उपकरणे घ्यावेत,असे सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.