राज्यातील सर्व शिक्षकांना ड्रेसकोडची सक्ती…
राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना विशिष्ठ प्रकारचा पेहराव ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी आज मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या असून त्यात पुरूष शिक्षकांना फिकट रंगाचा शर्ट आणि गडद रंगाची पँट आणि महिला शिक्षिकांना साडी, चुडीदार, कुर्ता, दुपट्टाचा पेहराव असे निश्चित करण्यात आले आहेत.
सोबतच शिक्षकांची समाजात एक वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या वाहनांवर अथवा नावापुढे डॉक्टरांप्रमाणे शिक्षकांच्या वाहनांवर ‘टीआर’ अथवा मराठी ‘टी’ असा वेगळा उल्लेख केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली.
पेहरावाचा हा निर्णय राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी, अल्पसंख्यांक संस्था, अनुदानित, स्वयंअथसहाय्यित आणि इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना लागू होणार आहे. शिक्षकांची जनमानसात त्यांच्या वेशभूषेमुळे वेगळी ओळख व्हावी, असा हेतू यामागे असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.
शालेय शिक्षण विभागाने या पेहरावासंदर्भात मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या असून त्यात सर्व शिक्षकांनी परिधान केलेला पेहराव हा व्यवस्थित असावा, त्यात महिलांनी साडी अथवा सलवार, चुडीदार, कुर्ता, दुपट्टा असा पेहराव करावा तर पुरूष शिक्षकांनी शर्ट, ट्राऊझर पँट आणि शर्ट इन करून तो परिधान करणे बंधनकारक आहे.
त्यात गडद रंगांचे व चित्रविचित्र नक्षीकाम, चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत शिवाय जीन्स, टी-शर्टचा वापर शाळांमध्ये करून नयेत असे आदेश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.