राजकोटमध्ये गेमिंग झोनला आग, २७ जणांचा होरपळून मृत्यू
गुजरातच्या राजकोट शहरातील टीआरपी गेमिंग झोनमध्ये शनिवारी भीषण आग लागून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ९ लहान मुलांचाही समावेश आहे. आग लागली तेव्हा या गेमिंग झोनमध्ये खूप गर्दी होती. शनिवारी सुट्टी असल्याने जास्तीत जास्त लोक यावेत यासाठी गेमिंग झोन मॅनेजमेंटने ९९ रुपये एंट्री फी स्किम ठेवली होती. फक्त ९९ रुपये प्रवेश शुल्क असल्याने मोठ्या प्रमाणात लोक तिथे आले होते.
गेमिंग झोनमध्ये खेळांसाठी फायबरचा घुमट उभारण्यात आला होता. सायंकाळी ४.३० वाजता तिथे मुले खेळत असताना अचानक आग लागली. आगीने हा घुमटही कोसळला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.
गेमिंग झोनमध्ये १५००-२००० लिटर डिझेल आणि कार रेसिंगसाठी १००० ते १५०० लीटर पेट्रोल साठवण्यात आलं होतं. पण, सुदैवाने ही आग त्या पेट्रोल-डिझेलपर्यंत पोहोचली नाही, अन्यथा आणखी मोठी जिवीतहानी झाली असती. या गेमिंग झोनमधून बाहेर निघायला आणि प्रवेशासाठी ६ ते ७ फुटांचा एकत रस्ता होता. त्यामुळे सर्वांना बाहेर येता आले नाही.
जे या घटनेत बचावले गेले त्यांनी सांगितलं की शनिवारी संध्याकाळी जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा अचानक तिथल्या स्टाफने येऊन सांगितलं की लवकर बाहेर निघा येथे आग लागली आहे. त्यानंतर सगळीकडे पळापळ झाली आणि लोक बाहेर निघायचा प्रयत्न करु लागले, पण, सगळे बाहेर येऊ शकले नाही. कारण, पहिल्या मजल्यावरुन बाहेर येण्यासाठी एकच रस्ता होता. ही आग इतकी भीषण होती की त्यात होरपळेलेल्या लोकांची ओळख करणेही कठीण झालं आहे. तिथे २७ जणांचे मृतदेह आढळल्याची माहिती राजकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सुमारे साडेचार तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीचे कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नाही. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत असल्याचे राजकोट पोलिस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले. राजकोटमधील सर्व गेमिंग झोन तूर्त बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे.