मोदींच्या मेक इन इंडियात कांदा बसत नाही का ? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू यांचे सरकारवर टीकास्त्र…
केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आणि निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.बच्चू कडू यांनी विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारला कांदा निर्णयावरुन चांगलेच सुनावले आहे. इथे बसायला लाज वाटते, अशा शब्दात कडू यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
सरकारने वेगवेगळ्या धोरणाने शेतकऱ्यांना मारले. सत्ता बदलते, मात्र शेतकऱ्यांच्या स्थितीत फारशी सुधारणा झाली नाही. जाती, धर्मांच्या चर्चेत लोकांना गुंतवून ठेवल जात आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. खर्च दुप्पट होत आहे. असे असतानाही सरकार शेतकऱ्यांसाठी चुकीच्या योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का ? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी विचारत सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले.
मी पक्षासोबत बेईमानी करेल, मात्र शेतकरी या माझ्या बापासोबत करणार नाही, असे म्हणत ५ लाखांच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ २३ हजार कोटी आले. बजेटमध्ये शेतकऱ्यांचे स्थान नगण्य आहे. शेतकऱ्यांच्या संख्येनुसार बजेटमध्ये भागीदारी द्या. कोणत्याच पक्षात ही धमक नाही. सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र असूनही शेतकरी दुर्लक्षित आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर अल्पकालीन चर्चेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले. केंद्राने कापसाचे ६ हजार भाव जाहीर केले. ८ हजार ८८६ दर मिळाला तर १५ टक्के नफा मिळतो. नफा न घेता माल विकावा लागत आहे. इतर पिकांचीही हीच स्थिती आहे.
तिकीट मागण्यासाठी जावे लागत असल्याने आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना पक्षाची भूमिका घेऊन बोलतात. पण आता शेतकऱ्याच्या बाजूने बोललं पाहिजे. शेतकऱ्याला घामाची किंमत मिळत नाही. मग भाजप असो किंवा काँग्रेसवाले असो कोणाच्यात धमक नाही. काँगेस आता आंदोलन करत चांगलं आहे. स्वामीनाथ आयोगाचं कोणीच ऐकलं नाही. शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. इथे बसायला लाज वाटते. कोणी पक्षाच्या बाजूने बोलू नका. तिकीट आहे म्हणून बाजू घेऊ नका. आम्ही कोणी पक्षाच्या विरोधात बोलत नाही. सरकारच्या धोरणांनी आम्हाला मारलं आहे, अशी टीका त्यांनी केली.