महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास…
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजेच्या सुमारास निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतलाय. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळ हळहळले आहे.
मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी जोशी एक होते. अनेक दिवसांपासून प्रकृती खराब असल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होते.
मनोहर जोशी हे मूळचे बीड जिल्ह्यातील होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले होते.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवली होती. यानंतर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, अशी पदे भूषवली.
राज्यात १९९५ साली युतीचे सरकार आले तेव्हा शिवसेनेकडून त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते.