मणिपूरमध्ये ७ महिन्यानंतर इंटरनेट सुरू होताच पुन्हा उफाळला हिंसाचार, १३ जणांचा मृत्यू…
मणिपूरमध्ये सात महिन्यानंतर इंटरनेटसेवा पूर्ववत सुरू होताच दोन गटामध्ये हिंसाचार पुन्हा उफाळला व यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सुरक्षा दलांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी दुपारच्या सुमारास टेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळ लेटिथु गावात दोन गटात जोरदार गोळीबार झाला. मणिपूरमधील हिंसा प्रभावित क्षेत्रात गेल्या सात महिन्यापासून इंटरनेट सेवा बंद होती. सरकारने रविवारी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करताच राज्यात पुन्हा हिंसाचार उफाळला आहे.
सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर लीथू गावात १३ मृतदेह आढळले. मृतदेहांजवळ कोणतेही शस्त्रे मिळाली नाहीत. असे वाटते की, मृत व्यक्ती लीथु भागातील नसून इतर कोणत्या तरी क्षेत्रातील आहेत. पोलीस व सुरक्षा दलांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.हिंसा भडकलेल्या ठिकाणापासून सुरक्षा दल जवळपास १० किलोमीटर दूर होते.
मणिपूरमध्ये ३ मे रोजी मैतेई आणि कुकी समुदायादरम्यान हिंसाचार भडकला होता. या संघर्षात कमीत कमी १८२ लोक मारले गेले होते तर जवळपास ५० हजार लोक बेघर झाले आहेत. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमध्ये ३ मे पासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. ही बंदी २३ सप्टेंबर रोजी काही वेळासाठी बंदी हटवली मात्र २६ सप्टेंबर रोजी पुन्हा इंटरनेट बंद करण्यात आले.