अपडेटअहमदनगरक्राईम

बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्याने चौघांवर गुन्हा दाखल

Share this post

अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करुन बनावट प्रमाणपत्र तयार करुन कर्णबधीर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र हस्तगत करणारे चौघे व सिव्हिल हॉस्पिटलमधील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालय कर्मचारी पतसंस्था येथे काम करणारा शिपाई व जिल्हा रुग्णालय ए आर टी सेंटर येथे काम करणारा कंत्राटी कर्मचारी यांनी रुग्णालयाचा आय डी व पासवर्डचा वापर करुन या चौघांची माहिती अपलोड केल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे.

सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, ता. पाथर्डी), प्रसाद संजय बडे (ता. पाथर्डी) सुदर्शन शंकर बडे (रा. येळी, ता. पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (रा. माणिक दौंडी, ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव विठ्ठलराव डावरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी संबंधित व्यक्ती हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह हजर राहून केस पेपर काढतात. संबंधित व्यक्तीची त्यांचे अपंगत्वाचे प्रकारानुसार वैद्यकीय तपासणी होऊन ती व्यक्ती दिव्यांग, अपंग असल्यास त्याच दिव्यांगाचे प्रकार व प्रमाणानुसार त्याची सर्व माहिती संबंधित विभागातील वैद्यकीय अधिकारी केसपेपरवर नोंद करतात. त्याच्या केसपेपरवरील अहवालानुसार डाटा इंट्री ऑपरेटर हे जिल्हा रुग्णालयाचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर सर्व माहिती अपलोड करतात़ त्यानंतर प्रमाणपत्र तयार होते.

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आय एस एस अधिकारी पुजा खेडकर हिने नगर सिव्हिल हॉस्पिटलमधून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले होते. त्यामुळे येथील हॉस्पिटलमधून देण्यात आलेल्या सर्वच दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे.

या चौघांबाबत तक्रारी आल्या होत्या. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात यांना ज्या दिवशी प्रमाणपत्र दिले गेले, त्यादिवशी जावक रजिस्टरला कुठलीही नोंद आढळून आली नाही. या रुग्णांची तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत पाठक यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण या कर्णबधीर असल्याची कुठलीही वैद्यकीय तपासणी केली नसल्याचे कळविले आहे.त्यामुळे या चौघांनी शासकीय योजनाचा फायदा मिळावा, म्हणून सिव्हिल हॉस्पिटलयेथील कोणाला तरी हाताशी धरुन जिल्हा रुग्णालयाचा आय डी व पासवर्ड वापरुन दिव्यांग पोर्टलवर खोटी माहिती अपलोड करुनबनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची व सिव्हिल हॉस्पिटलची फसवणूक केली आहे. तोफखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *