अपडेटदुर्घटनाशैक्षणिक

पाल पडलेलं दूध प्यायल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा…

Share this post

शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत उघडकीस आले आहेत. परंतु यामुळे विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास भोगावा लागतो. असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकातून उघडकीस आला आहे. शालेय पोषण आहारात मिळालेल्या दुधात पाल आढळली. ते दूध प्यायल्याने २३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सुदैवाने ही गोष्ट कळताच विद्यार्थ्यांना दूध पिण्यास मज्जाव करण्यात आला. दूध प्यायलेल्या २३ विद्यार्थ्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, शालेय पोषण आहारात हलगर्जीपणा झाल्याच्या घटनेवर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाकडून या प्रकरणी अधिक तपास आणि चौकशी सुरु आहे.

उल्लगडी खानापूर गावातील शाळा संकुलात कन्नड, मराठी आणि उर्दू प्राथमिक शाळा आहेत. या शाळेमध्ये सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळी ११:३० च्या सुमारास मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना दूध देण्यात आलं. दुधाची सेवा करणाऱ्या एका व्यक्तीला भांड्याच्या तळाशी एक मृत पाल आढळली. याबाबत त्याने तातडीने शिक्षकांना सांगितलं. ही माहिती मिळताच ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दूध प्यायलं नव्हतं, त्यांना दूध पिण्यास मज्जाव करुन त्यांच्याकडून दूध परत घेण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच हुक्केरी गटशिक्षण अधिकारी (BEO) प्रभावती पाटील यांनी शाळेला भेट दिली. शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यामागचं मूळ कारण सांगणं टाळण्यात आलं.

या घटनेचा तपास सुरू करण्यात आला असून कोणाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा शोध घेतला जाईल अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे..गटशिक्षण अधिकारी प्रभावती पाटील यांनी सांगितलं की, ५० हून अधिक विद्यार्थ्यांपैकी २३ विद्यार्थ्यांनी आधीच दूषित दूध प्यायलं होतं आणि त्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *