पालघरमधील आश्रमशाळेतील ७६ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा
पालघरमधील एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे रात्री या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आश्रमशाळेतील रुमवर गेले. रात्री अंदाजे २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच सकाळी काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. तर अनेक विद्यार्थिनींना उलट्या जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले.
विद्यार्थ्यांच्या उपचारादरम्यान यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचे कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रात्रीचे जेवण तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.