जि.प.शिक्षक आंतरजिल्हा बदल्या – ६ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची संधी…
ग्रामविकास विभागाकडून पात्र जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याची संधी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे
३० जून २०२३ रोजी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना या ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज करता येणार आहे.येत्या ६ डिसेंबरपर्यंत पात्र शिक्षक बदलीसाठी अर्ज करू शकतील.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली द्वारे केल्या जातात. जे शिक्षक बदलीस पात्र आहेत.त्यांच्याकडून आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच २०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते.परंतु ही प्रक्रिया राबवत असताना जे शिक्षक अंतरजिल्हा बदली मिळण्यास पात्र असूनही रिक्त जागेआभावी त्यांना बदली मिळाली नव्हती, अशा शिक्षकांना २०२२ मध्ये भरलेला अर्ज एडिट करण्याची संधी देण्यात आली आहे.
न्यायालयीन प्रकरणात व विभागीय आयुक्तांकडे अपील प्रकरणात बदल्यांबाबतचे स्पष्ट आदेश दिलेले असतील त्या शिक्षकांना अर्ज करण्याची संधी दिली जावी तसेच असे करताना संबंधित शिक्षकांनी सदर न्यायालयीन किंवा विभागीय आयुक्तांच्या आदेशाची प्रत अर्जासोबत पोर्टलवर सादर करावी. येत्या ६ डिसेंबरपर्यंत पात्र शिक्षक बदलीसाठी अर्ज करू शकतील. त्यानंतर बादलीची कार्यवाही केली जाणार आहे. याबाबातच्या आवश्यक सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी,असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षकांना संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी स्वतंत्रपणे लॉगीन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबत सुधारित धोरण ०७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे.
बदलीपात्र शिक्षकांसाठी रोष्टर (बिंदुनामावली) प्रसिद्ध करण्याची व अवलोकनाची कार्यवाही जिल्हास्तरावरून होईल. बदली हवी असलेल्या शिक्षकांना एका जिल्हा परिषदेतून दुसऱ्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, त्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेची एकूण मान्य शिक्षकांच्या पदांपैकी १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असू नये, असेही सूचित केले आहे. बदलीसाठी इच्छुक शिक्षकांना सर्व माहिती अचूक भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.