कोचिंग क्लासच्या तळघरात पावसाचं पाणी शिरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमधील एका कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पावसाचं पाणी अचानक शिरल्यानं तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. तानिया सोनी, श्रेया यादव (दोघी २५ वर्षांच्या) आणि नवीन डेल्विन (२८ वर्षे) अशी तिघांची नावं आहेत.
तानिया तेलंगणाची, श्रेया उत्तर प्रदेशची, तर नवीन केरळचा रहिवासी होता. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करण्यासाठी तिघेही दिल्लीत होते. शनिवारी अनेक विद्यार्थ्या नेहमीप्रमाणे कोचिंग सेंटरच्या ग्रंथालयात अभ्यास करत होते. तेव्हा पावसाचं पाणी कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये अचानक शिरलं. त्यात बुडाल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ कोचिंग सेंटरच्या समोरुन घेण्यात आलेला आहे. त्यात रस्त्यावर पाणी साचलेलं दिसत आहे. तितक्यात एक कार त्या पाण्यातून जाते. रस्त्यावर बरंच पाणी साचलं असल्यानं बहुतेकवेळा चालक कार कमी वेगात नेतात. पण चालकानं कार वेगात नेली. साचलेलं पाणी कापत कार वेगात पुढे गेली. त्यामुळे एक मोठी लाट तयार झाली. ही लाट कोचिंग क्लासच्या दारापर्यंत गेली.
कार जाण्याआधी कोचिंग क्लासचं दार बंद होतं. पण कार वेगात गेल्यामुळे मोठी लाट तयार झाली आणि ती वेगात दारावर धडकली. त्यामुळे दार सरकलं आणि पाणी वेगानं क्लासच्या बेसमेंटमध्ये शिरु लागलं. अवघ्या २ मिनिटांत कोचिंग सेंटरच्या तळघरात शेकडो लीटर पाणी शिरलं. बसमेंटमध्ये १२ फूट पाणी जमलं. त्यात अडकल्यानं तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंह यांना अटक करण्यात आली आहे.