कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग 41 जणांचा मृत्यू मृतांमध्ये बहुतांश भारतीय
कुवेतमधील मनकाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 41 कामगारांचा मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे.
आखाती देश कुवेतमधील मनकाफ शहरातील एका इमारतीला बुधवारी सकाळी आग लागली. यात 41 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांमध्ये अनेक भारतीयांचाही समावेश आहे. सर्व मृत मजूर असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या इमारतीत आग लागली तिथं कामगार राहात होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता इमारतीला आग लागल्याची माहिती मेजर जनरल ईद रशीद हमाद यांनी दिलीय.
सरकारी टीव्ही चॅनलशी बोलताना एका वरिष्ठ पोलीस कमांडरनं सांगितलं की, इमारतीमध्ये कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि तिथं मोठ्या संख्येनं कामगार होते. यात बऱ्याच लोकांची सुटका करण्यात आली. पण दुर्दैवानं आग लागल्यानंतर इमारतीमध्ये पसरलेल्या धुरामुळं अनेकांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीत अधिकाऱ्यांनी मृत कामगारांच्या नोकरीबद्दल किंवा ओळखीची माहिती दिलेली नाही. छोट्या इमारतीत जास्त कामगार ठेवण्याविरुद्ध आम्ही नेहमी इशारा देतो.
कुवेतच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, आगीच्या घटनेनंतर सुमारे 43 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. मात्र, पोलिसांनी नोंदवलेल्या 35 मृत्यूंमध्ये या चार मृत्यूंचा समावेश आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग आटोक्यात आली असून, त्याच्या कारणाचा शोध सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.