आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने बिल काढण्यासाठी मागितली लाच, गुन्हा दाखल
माहे जुलै 2024 चे पगार बिल काढण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी प्राथमिक शाळा गांधीनगर ता.कंधार येथील प्रभारी मुख्याध्यापकाविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस ठाणे कंधार येथे गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार प्राथमिक आश्रम शाळा गांधीनगर ता.कंधार जि.नांदेड येथे ते वस्तीगृह अधिक्षक आहेत. माहे जुलै 2024 या महिन् याचे पगार बिल काढण्याकरीता प्रभारी मुख्याध्यापक संभाजी रामजी कांगणे(54) यांनी वस्तीगृह अधिक्षकाकडे 5 हजार रुपयांची लाच मागितली. आपल्याकडे मागितलेली 5 हजार रुपये रक्कम लाचच आहे याची खात्री पटल्यानंतर वस्तीगृह अधिक्षकाने 24 जुलै 2024 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे तक्रार दिली.
या लाच मागणीची पडताळणी 1 ऑगस्ट 2024 रोजी शासकीय पंचासमक्ष झाली तेंव्हा पंचासमक्ष प्रभारी मुख्याध्यापक संभाजी कांगणे यांनी पुन्हा 5 हजार रुपयांची लाच मागणी केली. या लाच मागणी संदर्भाने कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक स्वप्नाली धुतराज आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी ही कार्यवाही केली आहे.