आश्रमशाळेचें मुख्याध्यापक,अधिक्षकासह एक जणांविरोधात गुन्हा दाखल…
शहापूर येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दुपारचं जेवण दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्याने विद्यार्थ्यांना शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना दाखल केले होते.
विद्यार्थ्यांना दिलेल्या पदार्थाचे नमुने तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.
चौकशी दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी दुपारी बाहेरून आलेले वर्षश्राध्दाचे पुलाव व गुलाबजाम खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ होऊन उलट्या व चक्कर येणे असा त्रास होवु लागला होता. त्या सर्व विद्यार्थ्यांना शहापुर येथे उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आश्रमशाळेतील मध्यान्ह भोजनाऐवजी बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या अन्नपदार्थामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर हानी पोहचण्याची शक्यता असतानाही वासिंद येथील पंढरी चव्हाण यांनी बाहेरील भोजन आणले व विद्यार्थ्यांना खायला दिले.
विद्यार्थ्यांना वर्षश्राद्धाचे अन्नपदार्थ दिल्याचे निष्पन्न झाले आहे.विद्यार्थ्यांना अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी बेजबाबदारपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या आश्रमशाळेतील अधिक्षक एन.डी.अंभोरे, प्राथमिकचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमती सारीका गायकवाड, माध्यमिकचे मुख्याध्यापक जीवनराव देशमुख आणि बाहेरील जेवण पुरवणारे वासिंद येथील पंढरी चव्हाण यांच्या विरोधात वासिंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आदिवासी विकास विभागाचे साहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारानंतर सोडण्यात आलेल्या सहा विद्यार्थ्यांना सकाळी पुन्हा चक्कर व पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना पुन्हा शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणी करीत पालकांनी आश्रमशाळेतच ठिय्या मांडला होता. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी ठिय्या उठवला.
खबरदारी म्हणून आश्रमशाळेत डॉक्टरांचे पथक, दोन रुग्णवाहिका व पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असल्याचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी सांगितले.