अभिनेत्री पूनम पांडे जिवंत, व्हिडिओ शेअर करून जिवंत असल्याची माहिती दिली…
अभिनेत्री पूनम पांडेच्या कथित निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अचानक, 2 फेब्रुवारी रोजी सकाळी, इंस्टाग्रामवर एका पोस्टने पूनम पांडेच्या चाहत्यांना धक्का बसला होता. अभिनेत्रीच्या मॅनेजरनेही पूनम पांडेच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. आता पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली आहे. तिने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
इन्स्टाग्राम पोस्टने सुरू झालेली पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी शेवटी एका इन्स्टा व्हिडीओने संपली आहे. पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी २ फेब्रुवारीला सकाळी आली. तिच्या मॅनेजरने पूनमचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले होते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाने तिचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. पूनम पांडेने आपण जिवंत असल्याचे सांगत सर्वाइकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी असे केल्याचे म्हटलं आहे.
पूनम पांडेने तिचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ती पूर्णपणे व्यवस्थित बसलेली दिसत आहे. “मी जिवंत आहे. मी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मरण पावले नाही. दुर्दैवाने, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी लढताना ज्या हजारो महिलांनी आपले प्राण गमावले आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू शकत नाही. त्यांना काहीच कळत नसल्याने त्या काही करू शकत नव्हत्या. मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की इतर कोणत्याही कर्करोगाच्या विपरीत, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर मात करणे शक्य आहे. तुम्हाला फक्त तुमच्या चाचण्या कराव्या लागतील आणि HPV लस घ्यावी लागेल,” असे पूनम पांडेने म्हटलं आहे.
पूनम पांडेचा नवा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओनंतर पूनम पांडेला खूप ट्रोल केले जात आहे. पूनम पांडेने तिच्या मृत्यूचे खोटे बोलून सोशल मीडियावर माफीही मागितली आहे. पूनमने HAUTERRFLY च्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, चाहत्यांची आणि नेटकऱ्यांची माफी मागताना हे सर्व गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी केले, असे म्हटलं आहे.