अपडेटमहाराष्ट्रशैक्षणिक

अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी होणार, जाणून घ्या.

Share this post

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात दहावीचा टप्पा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते.

विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे किंवा विविध कोट्याअंतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून, अशा दोन पद्धतीने प्रवेश घेता येईल. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती असणारा ऑनलाइन अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक केंद्रीय प्रवेश फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम अर्जाच्या दुसऱ्या भागात (भाग २) भरायचे आहेत. किमान १ व कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी दिलेला पसंतीक्रम आणि आलेल्या अर्जातील गुणक्रमानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालय (अलॉटमेंट) देण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करायचा आहे. कोट्यातून प्रवेश घ्यायचा असल्यास संबंधित महाविद्यालयातील जागेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ही विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात येईल.

यंदा तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्या, दोन विशेष केंद्रीय प्रवेश फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही. प्रत्येक नियमित फेरीबरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे.

विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाइन निवडावी लागतील.

अकरावी केंद्रीय प्रवेश अर्जाचा पहिला भाग, शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत ऑनलाइन भरायचा आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पुढील साधारण पाच दिवस महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ हा प्रत्येक फेरीपूर्वी भरता येईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यापासून ते प्रवेश निश्चित होईपर्यंतची पहिल्या नियमित केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गतची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या निकालानंतर १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित केंद्रीय प्रवेश फेरी, तसेच पहिली विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया ही ७ ते ८ दिवस सुरू राहील. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया एक आठवडा सुरू राहील.


Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *